बीसीसीआयने आयपीएलच्या आयोजनासाठी युएईला दिले तब्बल एवढे कोटी


नवी दिल्ली – संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन बीसीसीआयने युएईत केले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २९ मार्च रोजी सुरु होणारी स्पर्धा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. पण सुमारे ४ हजार कोटींचा फटका स्पर्धा रद्द केल्यास बीसीसीआयला बसणार होता. त्यामुळेच स्पर्धा भारताबाहेर आयोजित करण्याचे बीसीसीआयने ठरवले. बीसीसीआयला यासाठी सर्वात आधी युएई आणि त्यानंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने प्रस्ताव दिला होता. युएई क्रिकेट बोर्डाचा प्रस्ताव बीसीसीआयने स्विकारत तेराव्या हंगामाचे आयोजन युएईत केले.

युएईत १९ सप्टेंबरपासून तेराव्या हंगामाला सुरुवात झाली. हे सामने शारजा, दुबई आणि अबु धाबी अशा ३ मैदानावंर खेळवण्यात आले. बीसीसीआयने युएई क्रिकेट बोर्डाला तेराव्या हंगामाच्या आयोजनासाठी १४ लाख अमेरिकन डॉलर्स (भारतीय रुपयांमध्ये अंदाजे १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम) दिले असल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे.

मुंबईने १० नोव्हेंबरला झालेल्या अंतिम सामन्यात दिल्लीवर मात करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं. तेरावा हंगाम आटोपल्यानंतर लगेचच पुढच्या हंगामाची तयारी बीसीसीआयने सुरु केली आहे. पुढचा हंगाम भारतात आयोजित करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न असला तरीही खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने आयपीएल २०२१ आणि इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी युएई क्रिकेट बोर्डासोबत करार केला आहे.