पेंग्विननंतर भायखळ्याच्या राणी बागेत येणार हा नवा पाहुणा


मुंबई – भायखळ्यामधील प्रसिद्ध अशी राणीची बाग अर्थात वीरमाता जिजामाता उद्यान आता पेंग्विननंतर अ‍ॅनाकोंडाच्या स्वागताच्या तयारीसाठी सज्ज झाली आहे. मूळची साऊथ अमेरिकेची असलेली अ‍ॅनाकोंडा ही सापाची जात असून जगातील सर्वात मोठा साप म्हणून त्याची ओळख आहे. अ‍ॅनाकोंडासाठी राणीच्या बागेत खास रेपटाईल पार्क बनवण्यात आले आहे. आता केंद्रीय मंजुरीसाठी Central Zoo Authority प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. भारत आणि परदेशातील 20 विविध सापांच्या जाती यामध्ये ठेवल्या जाणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेने दीड हजार स्क्वेअर मीटर वर असणार्‍या या पार्कसाठी आवश्यक फंड दिला होता. आता दुसर्‍या टप्प्यातील काम 120 कोटी रूपये फंडाचा वापर करून सुरू करण्यात आल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. महानगरपालिकेने 2016 साली राणीच्या बागेत पेंग्विन आणले असून विशेष कक्ष त्यांच्यासाठी उभारले आहेत. दरम्यान त्यामधील दोघांचा मृत्यू देखील झाला आहे. मुंबईमध्ये पेग्विन आणण्याच्या निर्णयावरुन अनेकांनी महानगरपालिकेवर टीका देखील केली होती. राणीची बाग 1982साली उभारण्यात आली असून त्यावेळेस 53 एकरवर असलेल्या राणीच्या बागेचे क्षेत्र काही वर्षांपूर्वी वाढवण्यात आले आहे. मफतलाल मिल्सची 7 एकर जागा पालिकेने विकत घेतली आहे.