भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा बराक ओबामांना कोणी दिला अधिकार; राहुल गांधींची शिवसेनेकडून पाठराखण


मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेल्या टिप्पणीवर शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अशाप्रकारे भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा अधिकार ओबामा यांना कोणी दिला? भारतीय नेत्यांबाबत त्यांनी बोलणे चुकीचे असल्याचे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

मुंबईत शनिवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी राहुल गांधी हे खूप चांगले काम करत असल्याचा दावा यावेळी केला. त्यांच्याविषयी बराक ओबामा यांनी केलेले वक्तव्य अयोग्य आहे. एक वक्तव्य ओबामांनी केले अन् येथील नेत्यांनी त्याचे राजकारण केले, ही गोष्ट चुकीची आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत ओबामा बोलले तरीही माझी भूमिका हीच असेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

भाजप नेत्यांनी बराक ओबामा यांनी केलेल्या टिप्पणीनंतर राहुल गांधी यांना ट्रोल केले होते. देशातील बदनामी राहुल गांधी यांना कमी पडत होती की काय म्हणून आता ते परदेशातही स्वत:ची बदनामी करून घेत असल्याची खोचक टीका भाजप खासदार गिरीराज सिंह यांनी केली होती.