यंदा जैसलमेर सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करणार पंतप्रधान मोदी


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी दर वर्षीप्रमाणे यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. ते यासाठी यंदा राजस्थानमधील जैसलमेरच्या सीमेवर पोहोचले असून त्यांच्यासोबत यावेळी सीडीएस बिपीन रावत, लष्करप्रमुख एम. एम. नरवणे आणि बीएसएफचे महासंचालक राकेश अस्थाना उपस्थित आहेत.

भारत-पाकिस्तानची सीमारेषा राजस्थानमधील जैसलमेर येथून जाते. बीएसएफचे जवान या ठिकाणी सीमेवर तैनात आहेत. याच ठिकाणी प्रसिद्ध तनोट माता मंदिरही आहे. दरम्यान, येथील लोंगेवाला भागात बीएसएफच्या जवानांची पंतप्रधान मोदी यांनी भेट घेतली त्यांची विचारपूस केली तसेच दिवाळीनिमित्त त्यांना मिठाईचे वाटप करणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी २७ ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्यांनी सैन्याच्या गणवेशात जवानांमध्ये जाऊन सैनिकांना मिठाईचे वाटप केले होते. तत्पूर्वी २०१८ मध्ये त्यांनी उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथे लष्कर आणि आयटीबीपीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.

दरम्यान, ट्विटद्वारे पंतप्रधानांनी देशवासियांनी आवाहन केले आहे की, दिवाळीनिमित्त एक दिवा त्यांनी सीमेवर तैनात जवानांच्या नावे पेटवावा. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, या दिवाळीला एक दिवा सॅल्युट टू सौल्जरसाठी लावा. जवानांच्या अद्वितीय साहसासाठी आपल्या हृदयात जी आभाराची भावना आहे, ती शब्दांत व्यक्त केली जाऊ शकत नाही. आम्ही सीमेवर तैनात जवानांच्या कुटुंबियांचे देखील आभारी आहोत.