स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारतीय गोलंदाजांना डिवचले


मेलबर्न : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी यूएईहून टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. दौऱ्यासाठी रवाना झाल्याबरोबर भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथने आव्हान दिले आहे. जर माझ्याविरोधात शॉर्टपीच बॉल टाकण्याचा प्लॅन करणार असाल तर त्याची मला भीती नाही, पण तुम्ही करत असलेल्या प्लॅनचा काहीही फायदा होणार नसल्याचे म्हणत स्टीव्ह स्मिथने भारतीय गोलंदाजांना डिवचले आहे.

मी माझ्या जीवनात एवढ्या शॉर्टपीच बॉलचा सामना केला आहे की आता मला कसलीही चिंता वाटत नाही. जर माझ्याविरोधात भारतीय गोलंदाज शॉर्टपीच बॉल टाकून मला आऊट करण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. उलट त्यामुळे भारतीय संघाचा तोटाच होईल, असे स्टीव्ह स्मिथने म्हटले आहे.

स्टीव्ह स्मिथला न्यूझीलंडविरुद्ध खेळताना नील वॅगनरने 4 वेळा शॉर्ट पीच बॉलवर बळीचा बकरा बनवले. यावर बोलताना स्मिथ म्हणाला, वॅगनर एक वेगळ्या दर्जाचा बॉलर आहे. भारतीय गोलंदाज त्याची पुनरावृत्ती करायला गेले तर ते पचतावतील. त्याच्यासारखी गोलंदाजी करणे भारतीय गोलंदाजांना जमणार नाही, कारण तो एक उत्कृष्ठ गोलंदाज आहे.

गोलंदाजांमध्ये बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांत भारताची जबाबदारी असेल. बुमराह आणि शमीने याअगोदरही स्टीव्ह स्मिथला बऱ्याचदा आऊट केले आहे. कसोटी मालिकेत बुमराह-शमी-स्मिथ यांच्यात कसा सामना रंगतो, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.