संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती; कोरोनामुळे फुफ्फुसांमध्ये होत आहेत रक्ताच्या गुठळ्या


नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनावर यशस्वीरित्या मात करणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी अद्यापही नव्या कोरोनाबाधितांची संख्या म्हणावी तेवढी आटोक्यात आली नाही. त्याचबरोबर सध्या सुरु असलेल्या सणासुदीच्या दिवसांत कोरोनात पाळायच्या नियमांची लोकांनी पायमल्ली करून गर्दी केल्याने आता पुन्हा एकदा वेगाने हा संसर्ग पसरून दुसरी लाट भयंकर रुप घेणार का? अशी चिंता एकीकडे व्यक्त केली जात असताना एका नव्या संशोधनातून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या देशात कमी झाली आहे परंतु धोका अद्याप टळलेला नाही. बर्‍याच राज्यात, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. हा विषाणू प्रथम संक्रमित रूग्णांच्या फुफ्फुसांना नुकसान पोहोचवल्याचे कोरोना साथीच्या विषयी माहिती गोळा करणाऱ्या शास्त्रज्ञांनी समोर आणली. कोरोना झाल्यानंतर सर्वात जास्त धोका हा फुफ्फुसांना असतो. रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये अनेकदा रक्ताच्या गुठळ्या होतात, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. हरियाणा आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनामुळे रुग्णांच्या मृत्यूच्या तपासणीच्या वेळी हा खुलासा करण्यात आला आहे.

कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवणारे डॉ. राजेंद्र राय यांच्या मते, हा संसर्ग संक्रमित रूग्णांच्या छातीत दिसल्यानंतर त्याचे सीटीस्कॅन करण्यात आले. फुफ्फुसांमध्ये हा संसर्ग 75 टक्क्यांपर्यंत पसरला असेल तर त्यातून रुग्णाचे प्राण वाचवणे शक्य असते, पण त्यानंतर हे काम आव्हानात्मक होत जाते.