दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षय कुमारने शेअर केले आपल्या आगामी ‘राम सेतू’ चे पहिले पोस्टर


आजपासून पुढील तीन दिवसात दिवाळी सणाचा उत्साह असणार आहे. पण यंदाची दिवाळी ही कोरोना संकटामुळे काळजीपूर्वक साजरी केली जाणार आहे. दिवाळी बाबत बोलायचे झाले तर पौराणिक कथांनुसार, भगवान श्रीराम आजच्या दिवशीच अयोद्धेमध्ये परतले होते. दिवे लावून त्यांचे स्वागत केल्यामुळे दिवाळीत रोषणाई करण्याची प्रथा आहे. पण बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने आजच्या या दिवसाचा संदर्भ घेत त्याच्या आगामी ‘राम सेतू’ चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘रामसेतू’ चे अस्तित्त्व होते की ती केवळ भ्रामक कल्पना आहे याबद्दल मतमतांतर आहेत. दरम्यान अक्षय कुमारचा ‘रामसेतू’ हा चित्रपट त्याच राम सेतूच्या शोधात फिरणार्‍या एका पटकथेवर आधारित असणार आहे.


दरम्यान आज दिवाळी औचित्य साधत अक्षय कुमारने त्याची झलक असलेले ‘रामसेतू’ चे पहिले वहिले पोस्टर शेअर केले आहे. अक्षय कुमारच्या गळ्यात एक भगवा स्टोल या पोस्टरमध्ये दिसत आहे. मागे समुद्र आणि श्रीरामाची प्रतिमा आहे. आज ट्विटरच्या माध्यमातून अक्षयने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा करताना या दिवाळीत रामाचे स्मरण करून त्यांच्या काही विचारांनी भारताच्या आगामी पिढ्यांमध्ये ‘राम’ टिकून राहील असा एक सेतू बांधू, असे म्हटले आहे. केप ऑफ गुड फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करणार आहे.