आसामच्या हॉस्पिटलला मास्टर ब्लास्टरची मोठी मदत


मुंबई – आसामच्या हॉस्पिटलला आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारा आणि क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मोठी मदत केली असून त्याच्या मदतीमुळे वंचित कुटुंबातील 2000 मुलांना फायदा होणार आहे. सचिन तेंडुलकर सामाजिक कार्यातही आघाडीवर आहे. त्याने याआधीही अधिक समाजकार्यात सहभाग घेतला आणि स्वतः आर्थिक मदतही केली. त्यात आता आणखी एक बहुमुल्य कार्याची भर पडली आहे. तेंडुलकरने आसामच्या चॅरिटेबल हॉस्पिटलला मेडिकल उपकरणं दान केले आहेत.

मुलांच्या वैद्यकीय तपासणीसाठी लागणारी उपकरणे आसाममधील करिमगंज जिल्ह्यातील माकुंडा हॉस्पिटलला त्याने दान केली आहेत. नवजात बालकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. याबद्दल माकुंडा हॉस्पिटलचे बाल विशेषज्ञ सर्जन डॉ विजय आनंद इस्माइल यांनी सचिनचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, हॉस्पिटलला सचिन तेंडुलकर आणि एकम या सेवाभावी संस्थेच्या मदतीने मोलाची मदत झाली आहे. यामुळे गरीब लोकांना कमी पैशांमध्ये चांगला सुविधा मिळू शकतील. UNICEFचा तेंडुलकर हा गुडविल अॅम्बेसिडर आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील आदीवासींना पोषक आहार व शिक्षण पुरवण्याचे काम तेंडुलकरचे फाऊंडेशन करते. तसेच उत्तर-पूर्व भागातील अनेक वंचित भागांमध्ये ही फाऊंडेशन काम करते.