यामुळे ट्विटरवर ट्रेंड होत आहे #माफ़ी_माँग_ओबामा हॅशटॅग


नवी दिल्ली – आपल्या आत्मचरित्रात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी गोंधळलेले विद्यार्थी असा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा उल्लेख केला आहे. एखाद्या घाबरलेल्या विद्यार्थ्यासारखे राहुल गांधी वाटतात, ज्याने संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला असून आपल्या शिक्षकांना प्रभावित करण्यासाठीही तयार आहे. पण त्या विषयामध्ये कुठेतरी प्राविण्य मिळवण्याची योग्यता तसेच चमक या विद्यार्थ्यामध्ये दिसत नसल्याचा उल्लेख केला आहे.

ओबामाच्या ‘ए प्रॉमिसिड लँड’ या आत्मचरित्रासंदर्भात ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने एक लेख लिहीला असून यासंदर्भातील उल्लेख त्यामध्येच आहे. आपल्या आत्मचरित्रात जगभरातील राजकीय नेत्यांव्यतिरिक्त इतर विषयांवरही बराक ओबामा यांनी भाष्य केले आहे. पण सध्या सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्यासंदर्भातील उल्लेखाची चांगलीच चर्चा असून राहुल यांच्याबद्दल ओबामा यांनी असे शब्द कसे वापरले, असा प्रश्न भारतीय नेटकऱ्यांनी विचारला आहे. नेटकऱ्यांनी याचसंदर्भात आक्षेप नोंदवताना ओबामांनी माफी मागावी असेही म्हटले आहे. सध्या ट्विटरवर #माफ़ी_माँग_ओबामा हा हॅशटॅग टॉप ट्रेण्ड होत आहे.

अनेकांनी राहुल गांधींचा जो उल्लेख ओबामा यांनी केला आहे, त्यावरुन राहुल यांना ट्रोल केले आहे. तर राहुल यांच्याबद्दलच्या वक्तव्यावर अनेक काँग्रेस समर्थकांनी आक्षेप घेत ओबामा यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे टीका करणारे आणि राहुल यांना ट्रोल करणारे दोन्ही बाजूचे नेटकरी यासंदर्भात ट्विट करताना #माफ़ी_माँग_ओबामा हा हॅशटॅग वापरत असल्याने हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डींग आहे.