जगभरात कोरोनाचा कहर; पहिल्यांदाच एका दिवसात 6.38 लाख कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली – जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाचा कहर कायम असून सध्याच्या घडीला कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत विक्रमी स्तरावर वाढ होताना दिसत आहे. मागील 24 तासांत जगभरात 6 लाख 38 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर यात 9 हजार 593 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती जगातील सर्वात सामर्थ्यवान देश अमेरिकेत अत्यंत वाईट होत चालली आहे. अमेरिकेत दररोज दीड ते दोन लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे.

यासंदर्भात वर्ल्डोमीटर वेबसाइटनुसार, जगभरात आतापर्यंत 5 कोटी, 30 लाख 69 हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 12 लाख 98 हजार 493 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दुसरीकडे या महामारीतून 3 कोटी 71 लाख लोक बरे झाले आहेत. सध्या 1 कोटी 45 ​लाख रूग्णांवर उपचार सुरू असून त्यातील 95 हजार लोकांची प्रकृती गंभीर आहे.

अमेरिका कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेल्या देशांच्या यादीत अव्वल आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 1 लाख 59 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यानंतर दुसऱ्या स्थानी भारत असून भारतात 87 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत 43 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिका आणि भारतानंतर ब्राझीलमध्ये कोरोनाचा प्रभाव पाहायला मिळतो. ब्राझीलमध्ये 24 तासांत 34 हजार नवी प्रकरणे नोंदविली गेली आहे. दरम्यान जगातील संक्रमित लोकांमध्ये भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर मृत्यूच्या सर्वाधिक घटनांमध्ये भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. तसेच जगभरात सर्वात जास्त अ‍ॅक्टिव रुग्ण आढणारा भारत भारत चौथा देश आहे.