किरीट सोमय्यांच्या आरोपांना संजय राऊतांचे उत्तर; बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांमध्ये जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा करत अनेक गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहेत. अन्वय नाईक कुटुंबियासोबत उद्धव ठाकरे यांचे नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना त्यांच्या शैलीत ट्विट करत उत्तर दिले आहे.


या संदर्भात संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये अन्वय नाईक यांच्याशी 21 व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एका भगिनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहाराबाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्याबाबत आहे. शेठजी, जरा जपून!” जय महाराष्ट्र, असे म्हटले आहे.

दरम्यान उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी किरीट सोमय्या यांचे आरोप म्हणजे जेवणातील पंगतीत लोणचे वाढल्या सारखे आहे. त्यांच्याकडे फार महत्व द्यावसे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या शपथ पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सगळ्याचा उल्लेख केलेला असल्यामुळे यात काही नवीन नाही. ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी द्यावेत. पुढील महिनाभरात आणखीन पूरावे द्यावेत अन्यथा त्यांनी माफी मागावी, असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.