गिनीज बुकात होणार यंदाच्या अयोध्येतील दिवाळीची नोंद


अयोध्या : अयोध्येत सन २०१७ पासून योगी आदित्यनाथ सरकारने दीपोत्सवाची सुरुवात केल्यानंतर आता दिव्यांच्या संख्येत सुमारे ४ पट वाढ झाली आहे. यामुळे यावेळची अयोध्येतील दिवाळी विशेष असणार आहे. याचे कारण म्हणजे १६ शृंगारांनी अयोध्या नगरीला सजवले जाणार आहे. अयोध्येतील २४ घाट या निमित्ताने दिव्यांच्या प्रकाशाने न्हाऊन निघणार आहेत. विशेष म्हणजे, कोरोनाचा प्रोटोकॉल लक्षात घेत दिवाळीत सर्व नियमांचे पालन करण्यासाठी सर्व प्रकारची व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे.

अयोध्या दीपोस्तवानिमित्त यंदा ५ लाख ५१ हजारांहून अधिक दिव्यांनी झगमगून जाणार असल्यामुळे अयोध्या नगरीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले जाणार आहे. सन २०१७ पासून अयोध्येत दीपोत्सव साजरा करण्याची सुरुवात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. तसेच १ लाख ६५ हजार दीप त्यावेळी उजळण्यात आले होते. तसेच सन २०१८ मध्ये ३ लाख १५० दिवे लावण्यात आले . त्यावेळी जागतिक विक्रम झाला होता. यानंतर सन २०१९ मध्ये ५ लाख ५१ हजार दिवे लावून जागतिक विक्रम रचला गेला होता.

अयोध्येत २४ घाटांवर या वेळी ६ लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. २९ हजार लीटर तेलाचा वापर यासाठी करण्यात येणार आहे. दिव्यांच्या प्रकाशाने अयोध्येला प्रकाशमान करण्यासाठी ७.५ लाख किलो रुईचा देखील वापर होणार आहे. राममंदिर निर्माण करण्याच्या निर्णयानंतर दीपोत्सवासाठी रामनगरीचे साधुसंत आणि भक्तांमध्ये उत्साह आहे. त्रेतायुगासारखी दिवाळी साजरी करण्याची परंपरा अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सन २०१७ साली सुरू केली होती. तेव्हा पासून दरवर्षी येथे दीप प्रज्वलित करण्याचा विक्रम रचले जात आहेत.