संशोधकांनी लावला ‘प्लाझ्मा जेट’चा शोध; ज्यामुळे ३० सेकंदात होणार कोरोनाचा खात्मा


जगावर ओढावलेल्या कोरोना या दुष्ट संकटातून लवकरात लवकर मुक्तता होण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचबरोबर अनेक देशांमध्ये या लसींची चाचणी देखील सुरु आहे. त्यातील काही लसी चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे. हे संशोधन सुरु असतानाच वैज्ञानिकांनी कोरोनाचा विषाणू नष्ट करण्याची क्षमता प्लाझ्मा जेटमध्ये असल्याचा दावा केला आहे. अवघ्या ३० सेकंदांमध्ये प्लाझ्मा जेटच्या मदतीने कोरोना विषाणूचा खात्मा होत असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

अमेरिकेतील लॉस एन्जलिसमधील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये करण्यात आलेल्या संशोधनामध्ये प्लाझ्मा जेटच्या मदतीने धातू, चामडे आणि प्लास्टिकवर असणारा कोरोना अवघ्या ३० सेकंदांमध्ये नष्ट करता येतो. थ्री-डी प्रिंटरच्या मदतीने हा प्लाझ्मा जेट संशोधकांनी तयार केला आहे. या प्लाझ्मा जेटची पहिली चाचणी यशस्वी ठरली आहे.

प्लाझ्मा जेटचा स्प्रे संशोधनामध्ये प्लास्टिक, धातू, कार्डबोर्ड आणि चामड्यावर मारण्यात आला. कोरोनाचा विषाणू हा यामध्ये तीन मिनिटांपेक्षा कमी कालावधीमध्ये नष्ट करण्यात यश आल्याचे दिसून आले. बहुतांश विषाणू हे ३० सेकंदांमध्ये नष्ट झाले. यासंदर्भातील संशोधनाचा अहवाल फिजिक्स ऑफ फ्लुएड्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

या अहवालात प्लाझ्मा जेट हा पदार्थांच्या चार मूळ अवस्थांपैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्थिर गॅसला गरम करुन किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्डच्या संपर्कात आणून प्लाझ्मा जेट तयार करता येतो. प्लाझ्मा जेट स्प्रे हा फेस मास्कवरही वापरता येईल. इतर गोष्टींप्रमाणे हे मास्कवरही परिणामकारक ठरेल. वेगवेगळ्या पृष्ठभागांवर अनेक तास कोरोनाचा विषाणू राहू शकतो, असे या पूर्वीच्या अनेक संशोधनांमध्ये दिसून आल्यामुळे प्लाझ्मा जेटच्या मदतीने वस्तूंच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग थांबवण्यास मदत होईल, असा विश्वास संशोधकांना आहे.

केवळ वस्तूंच्या माध्यमातून प्लाझ्मा जेट ही पद्धत कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी वापरता येणार असल्यामुळे लस आणि प्लाझ्मा जेट या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्लाझ्मा जेट हे केवळ निर्जीव वस्तूंवर वापरण्यासाठी तयार करण्यात आले आहे.