कोव्हिड सुरक्षा मिशन अंतर्गत कोरोना प्रतिबंधक लस बनवण्यासाठी 900 कोटींची तरतूद


नवी दिल्ली : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद पार पडली असून त्यांनी यावेळी कोरोना संकटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली. त्यांनी आत्मनिर्भर भारत 3.0 पॅकेज अंतर्गत 12 वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री सीतारमण यांनी देशातील रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची घोषणा केली आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोरोना महामारीमुळे मोठा परिणाम झाला आहे. आरोग्य मंत्रालय कोरोनाशी लढण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोनावरील लस तयार करण्याचा देशातील विविध कंपन्या प्रयत्न करत आहेत. अर्थमंत्री सीतारमण यांनी यादरम्यान भारतात कोरोनावरील लस तयार करण्यासाठी अतिरिक्त बजेटची घोषणा केली आहे.

900 कोटी रुपयांची तरतूद कोव्हिड सुरक्षा मिशन अंतर्गत संशोधन आणि लस विकसित करण्यासाठी करण्यात आली आहे. ही रक्कम डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजीला कोव्हिड सुरक्षा मिशन अंतर्गत देण्यात येणार आहे. दरम्यान पुणे स्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने गुरुवारी घोषणा केली आहे की, कोरोनावरील लशीची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली आहे.

संपूर्ण जगात कोरोना विषाणू संसर्गामुळे 10 लाख लोकांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे जगातील सर्व नागरिक कोरोना लसीची वाट पाहात आहे. जगभरातील विविध देशांमध्ये कोरोनावरील लसींचे संशोधन सुरु आहे. मानवी चाचणी दरम्यान काहीवेळा लसींचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. ऑक्सफोर्ड आणि जॉनसन अँड जॉनसन कंपन्यांना त्याच्या कोरोना लसींच्या चाचण्या थांबवाव्या लागल्या होत्या. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 154 कोरोना लसीवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. यापैकी 44 लसी मानवी चाचण्यांपर्यंत पोहोचल्या आहेत.