समर्थकाला उमेदवारी न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चांचे पंकजा मुंडेंकडून खंडण


औरंगाबाद: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत समर्थकाला उमेदवारी न मिळाल्यामुळं नाराज असल्याच्या चर्चेचे खंडन केले. मी कोणत्याही प्रकारे नाराज नाही. पक्षाने मला वगळून उमेदवार दिलेला नाही आणि उमेदवारी अर्जही मला वगळून भरू शकत नाही. त्यासाठी मी स्वत: येथे असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

भाजपने मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे रमेश पोकळे व प्रवीण घुगे यांनी बोराळकर यांच्या विरोधात बंडखोरी करून अर्ज भरला आहे. पंकजा मुंडे यांचे हे दोघेही समर्थक मानले जातात.

आज पंकजा मुंडे यांनी त्याच अनुषंगाने पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका मांडली. मी कोणत्याही प्रकारे नाराज नाही. माझे कार्यकर्ते आणि समर्थक नाराज असतील तर त्यांच्याशी संवाद कसा साधायचा हे मला माहीत असल्याचे पंकजा यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. यापूर्वी उमेदवार गोपीनाथ मुंडे निश्चित करायचे. आता त्यांच्या मुलीला वगळून उमेदवार ठरवले जातात, असे विचारले असता, तसे काही नाही. तसे चित्र रंगवू नका, असे पंकजा म्हणाल्या.

रमेश पोकळे किंवा प्रवीण घुगे यांना माझे समर्थक म्हणणे चुकीचे आहे. ते भाजपचे समर्थक आणि कार्यकर्ते आहेत. माझा जन्म होण्याच्या आधीपासून ते पक्षात असल्याचे पंकजा म्हणाल्या. पण ते जरी भाजपचे कार्यकर्ते असले तरी तुमचा शब्द मानतात, असे विचारले असता, त्यांना मी शब्द टाकेन, असेही त्यांनी सांगितले.