कोरोनाकाळात नोकरी गमावलेल्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा


नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनामुळे नोकरी गमवावी लागलेल्यांना पुन्हा सक्षमपणे उभे करण्यासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार ज्यांनी पीएफसाठी ‘आत्मनिर्भर भारत रोजगार योजने’ अंतर्गत नोंदणी केली नाही आणि ज्यांचा पगार 15 हजारापेक्षा कमी आहे, तसेच कोरोना काळात ज्यांची नोकरी गेली आहे, अशा बेरोजगारांना ईपीएफओअंतर्गत आणून पीएफचा लाभ त्यांना देण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली. संघटित क्षेत्रातील कामगारांना सीतारमण यांच्या या घोषणेमुळे मोठा लाभ मिळणार आहे.

देशात आर्थिक मंदीचे सावट घोंघावत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेचे विवरण मांडले. तसेच देशातील अर्थव्यवस्थेत सध्याच्या आकडेवारीवरून सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत असल्याचा दावाही केला. भारताची अर्थव्यवस्था कोरोना महामारीतही मजबूत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.