नागा साधूंच्या अटकेची मागणी करणाऱ्या पूजा बेदीला कुंभमेळ्याचे आमंत्रण


अखिल भारतीय आखाडा परिषदेने अभिनेता मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोची तुलना नागा साधूंसोबत केल्याने तीव्र निषेध नोंदवला असून या परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी पूजा बेदीच्या विधानाबाबत संताप व्यक्त करत म्हणाले, पूजा बेदी यांना नागा परंपरेबाबत कोणतीही माहिती नसल्यामुळे हरिद्वार येथे पुढच्या वर्षी होणाऱ्या महाकुंभमेळ्याला आम्ही त्यांना आमंत्रित करत आहोत. त्यांना तिथे आल्यावर नागा साधूंबाबत आणि नागा परंपरेबाबत त्यांच्या ज्ञानात थोडीफार भर पडेल.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमणने आपला न्यूड फोटो पोस्ट केला होता. हा फोटो गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर पळतानाचा होता. अनेकांनी त्या फोटोवर टीका केली. त्याचबरोबर मिलिंदविरोधात तक्रारदेखील दाखल करण्यात आली. पण या घटनेनंतर पूजा बेदीने मिलिंदची पाठराखण केली होती.

पूजाने मिलिंदच्या समर्थनार्थ ट्विट करत लिहिले, कोणतीही अश्लिलता मिलिंदच्या फोटोमध्ये नाही. तो फोटो पाहून कल्पना करणाऱ्यांच्या डोक्यातच अश्लिलता भरली आहे. त्याचा अपराध एवढाच आहे ते म्हणजे चांगले दिसणे, प्रसिद्ध होणे आणि बेंचमार्क प्रस्थापित करणे. नग्नता हा जर अपराध असेल तर नागा साधूंना देखील अटक झाली पाहिजे. ते केवळ शरीरावर राख लावतात म्हणून त्यांच्या नग्नतेचा स्विकार नाही करु शकत.

महंत गिरी पूजाच्या या ट्विटबद्दल म्हणाले, नागा साधूंची देशात एक परंपरा आहे. एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्याच्या नग्नतेशी, अश्लिलतेशी त्याची तुलना करणे अत्यंत चुकीचे आहे. कुंभमेळ्यात काही वेळ पूजा यांनी घालवावा. तिथे त्यांना नागा साधूंच्या कठीण तपश्चर्येची प्रचिती येईल.