ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत टीम इंडिया रेट्रो जर्सी घालून मैदानात उतरणार


नवी दिल्ली – नुकताच आयपीएलचा तेरावा हंगाम संपला आहे. त्यानंतर आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया लॉकडाऊननंतर आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघ २७ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ एकदिवसीय, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. याच दरम्यान आऊटलुकने दिलेल्या वृत्तानुसार या दौऱ्यावर एकदिवसीय आणि टी-२० मालिका टीम इंडिया रेट्रो जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.

सध्या टीम इंडियाच्या जर्सीचा रंग हा निळा आहे. पण टीम इंडियाची ७० ते ८० च्या दशकात गाजलेली रेट्रो जर्सी चाहत्यांना पुन्हा मैदानात पहायला मिळणार आहे. टीम इंडियाचा नवीन किट स्पॉन्सर MPL (Mobile Premier League) चा लोगो या नव्या जर्सीवर आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या किट स्पॉन्सरचे हक्क काही दिवसांपूर्वीच MPL ला दिले आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघही भारतीय संघाप्रमाणेच या दौऱ्यावर खास डिजाईन केलेली जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.