मुंबईतील या रुग्णालयात होणार बायोटेकच्या कोरोना लसीची मानवी चाचणी


मुंबई : देशातील स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची लवकरच मानवी चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीला लवकरच राज्यात सुरुवात होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय अर्थात सायन रूग्णालयात या चाचण्या होणार असून या चाचण्या एक हजार स्वयंसेवकांवर घेतल्या जाणार आहेत.

ही कोरोना प्रतिबंधक लस हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने विकसित केली असून चाचणीसाठी स्वयंसेवक मिळावेत यासाठी जाहिरात देखील दिली जाणार आहे. यामुळे भारतीय लसीबाबतची चाचणी करणारे सायन रूग्णालय हे मुंबईतील पहिले रूग्णालय ठरणार आहे. या चाचण्या आयसीएमआरच्या मदतीने घेतल्या जाणार आहेत. या चाचण्यांद्वारे लसीबाबत परिणामकारकता आणि सुरक्षा तपासली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात ही चाचणी यशस्वी झाली तर तिचा लवकरात लवकर वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यास मदत होणार आहे.