अर्णब गोस्वामींच्या सुटकेनंतर राम कदमांनी अशा प्रकारे व्यक्त केला आनंद


मुंबई – बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने संपादक अर्णब गोस्वामी यांना हंगामी जामीन मंजूर केला. अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक केली होती. सत्र न्यायालय व उच्च न्यायालयात निराशा पदरी पडल्यानंतर अर्णब यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान सर्वोच्च न्यायालयातील न्या. धनंजय चंद्रचूड यांनी बुधवारी सुनावणीदरम्यान न्यायदान करणारी घटनात्मक संस्था म्हणून आपण (न्यायालय) कायद्याची अंमलबजावणी केली नाही, नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण केले नाही तर कोण करणार, अशी परखड टिप्पणी केली.

भाजप आमदार राम कदम यांनी अर्णब गोस्वामी यांची सुटका झाल्यानंतर मंत्रालयाबाहेर पेढे वाढत आनंद साजरा केला. राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये लोकशाहीचा विजय झाल्याची भावना व्यक्त करत दिवाळी सुरु झाल्याचे म्हटले आहे.


सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना हंगामी जामीन मंजूर करताना, उच्च न्यायालयावर गोस्वामी यांना जामीन न दिल्याबद्दल ताशेरे ओढले. सकाळी ११ ते दुपारी साडेचार अशी साडेपाच तास न्या. चंद्रचूड व न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने सलग सुनावणी घेतली. आपली लोकशाही अत्यंत सक्षम आहे. राज्य सरकारांनी वृत्तवाहिन्यांवरून झालेल्या टिप्पणीकडे दुर्लक्ष केले पाहिजे. या मुद्दय़ांवर निवडणूक लढवल्या जात नाहीत. निवडणुकीवर अशा टीका-टिपणीचा खरच काही फरक पडतो, असे राज्य सरकारांना वाटते का, असा प्रश्नही न्यायालयाने केला.

गोस्वामी यांना रायगडमधील वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. ५० हजारांच्या जातमुचलक्यावर गोस्वामी व अन्य तीन आरोपींना हंगामी जामीन देण्यात आला. जामिनासाठी सत्र न्यायालयात दाद मागण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यावर, आरोपीला योग्य व निष्पक्षपणे न्याय मागण्याची संधी दिली गेली पाहिजे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.