आता कोंबड्या विकणार धोनी

फोटो साभार न्यू इंडियन एक्सप्रेस

टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी उर्फ माहीने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली असून निवृत्तीनंतर खास व्यापारात रस दाखविला आहे. धोनी रांची मध्ये झाबुआ कडकनाथ कोंबड्यांचा व्यापार करणार असून त्याने २ हजार पिलांसाठी पैसे भरून बुकिंग केले आहे असे समजते.

धोनीने यापूर्वीच जैविक शेतीची सुरवात केली आहे आणि आता तो कोंबड्यांचा व्यापार करणार आहे. कडकनाथ कोंबडी पिलांच्या बुकिंग साठी त्याने त्याचा जुना मित्र पशुवैद्य कुल्डू यांची मदत घेतली आहे. त्यांनी झाबुआ येथील आदिवासी शेतकरी विनोद माडा यांच्याकडून पिले खरेदीसाठी पैसे दिले आहेत. विनोद ही पिले स्वतःच रांची येथे नेऊन देणार आहे. त्याला या ऑर्डरमुळे खूप आनंद झाला असून धोनीची भेट घेण्यास तो उत्सुक आहे असे समजते.

विनोदला १५ डिसेंबर पर्यंत ही दोन हजार पिले द्यायची आहेत. पिले खरेदीसाठी प्रथम झाबुआ कडकनाथ अनुसंधान केंद्राशी प्रथम संपर्क साधला गेला होता पण त्याच्याकडे इतक्या संखेने पिले उपलब्ध नव्हती असेही समजते.

आदिवासी भाषेत कडकनाथ कोंबडीला कालामासी म्हटले जाते. त्याची चोच, पंख, नखे, मांस, तंगड्या, काळी असतात. या कोंबड्या मध्ये प्रोटीन्स खूप प्रमाणात असतात आणि चरबी कमी असते. धार, झाबुआ, बस्तर, छतीसगढ़, गुजराथ आणि राजस्थानच्या काही भागात ही जात सापडते. त्यात तीन जाती आहेत. काला कुडकी जातीत पंख काळेभोर असतात, पेन्सिल जातीत कोंबड्याचा आकार पेन्सिल प्रमाणे असतो तर गोल्डन मध्ये पंखावर सोनेरी झाक असते. या कोंबड्याच्या किमती सर्वसामान्य कोंबड्यांच्या तुलनेत तिपटीपेक्षा आधी असतात शिवाय याची अंडी सुद्धा खूप महाग म्हणजे ४० रुपयाला एक अशी मिळतात.