दिवाळीमुळे घुबडे संकटात

फोटो साभार ट्राफिक ओआरजी

दिवाळी हा आनंदाचा उत्सव. पण घुबड या पक्ष्यासाठी मात्र तो जीवावरचा ठरतो. दिवाळीत लक्ष्मीची पूजा केली जाते आणि घुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे. हिंदू धर्मात घुबड ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतिक मानले गेले आहे. त्यामुळे दिवाळीत तांत्रिक लक्ष्मी देवीला खुश करण्यासाठी घुबडे बळी देतात. वास्तविक घुबड पाळणे, पकडणे आणि त्याच्या खरेदी विक्रीवर कायद्याने बंदी आहे. मात्र दिवाळी काळात घुबडांची शिकार वाढते आणि चोरीच्या मार्गाने देशभरात घुबडांची तस्करी केली जाते. या काळात घुबडांच्या किमती ३०० रुपयांपासून ५० हजार रुपयांदरम्यान असतात.

भारतात घुबडांच्या ३२ प्रजाती आहेत आणि त्यातील १३ प्रजाती या बळी देण्यासाठी विशेष पसंत केल्या जातात. उत्तराखंड वनविभागाने घुबडांचे अस्तित्व धोक्यात येऊ नये यासाठी जिम कार्बेट पार्क मध्ये दिवसा आणि रात्रीची गस्त वाढविली असून सर्व वन कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. घुबडांची अवैध शिकार रोखण्यासाठी ही योजना केली गेली आहे. घुबड पाळणे, खरेदी विक्री, शिकार यावर कायद्याने बंदी असून त्यासाठी सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र तरीही दिवाळी काळात अनेक घुबडांचे जीवन संकटात सापडते असे दिसून येते.