गाड्यांच्या विविध रंगांच्या नंबरप्लेट काय देतात संकेत?

फोटो साभार टोटल ज्ञान

रस्त्यावर आपण दररोज शेकडो वाहने पाहतो. विविध आकाराची, विविध मॉडेलची, विविध रंगांची, विविध फिचर्सची ही वाहने विविध कारणांसाठी वापरली जात असतात. आपल्या बरेचदा लक्षात येत नाही पण विविध वाहनांसाठी वेगवेगळ्या रंगाच्या नंबरप्लेट दिसतात. अर्थात या प्रत्येक रंगातून एक संकेत दिला जात असतो. काय असतो या विविध रंगांच्या नंबरप्लेटचा संकेत हे पाहू.

बहुसंख्य वाहनांवर पांढऱ्या रंगाची प्लेट आणि त्यावर काळ्या रंगातील आकडे दिसतात. याचा अर्थ ही वाहने व्यावसायिक वापराची नाहीत तर ती खासगी वाहने आहेत. ट्रक, टॅक्सीच्या नंबर प्लेट पिवळ्या रंगाच्या आणि त्यावर काळ्या रंगातील आकडे दिसतात. याचा अर्थ ही वाहने व्यावसायिक वापराची आहेत.

काही वाहनांवर निळी नंबरप्लेट दिसते. त्यावर पांढऱ्या रंगात आकडे असतात. याचा अर्थ ही वाहने विदेशी प्रतिनिधी किंवा विदेशी दूतावासाची आहेत किंवा युएन मिशन साठी आहेत. काही वाहनांवर काळ्या रंगाची नंबरप्लेट आणि त्यावर पिवळ्या रंगाचे आकडे असतात. ही वाहने खास व्यक्तींसाठी असतात. बहुदा मोठ्या हॉटेल्समधून अशी वाहने दिसतात.

लाल रंगाची नंबरप्लेट राष्ट्रपती, राज्यपाल यांच्या वाहनांवर असते. त्यावर सोनेरी रंगात आकडे लिहिलेले असतात तसेच अशोक स्तंभ सुद्धा असतो. काही वाहनांच्या नंबरप्लेट वर आकड्यांच्या मागे किंवा पुढे बाण असतो. ही वाहने सैन्य दलाची असतात. त्याच्यासाठी वेगळी नंबर पद्धती आहे. त्यांना संरक्षण मंत्रालयाकडून वाहन नंबर दिले जातात.

यात पहिल्या आकड्याच्या अगोदर किंवा दोन आकड्यांनंतर वर टोक असलेला बाण असतो त्याला ब्रॉड अॅरो म्हटले जाते. यातील पाहिले दोन आकडे वाहनाच्या खरेदीचे वर्ष सांगतात. रस्ते परिवहन मंत्रालयाने आता इलेक्ट्रिक वाहनांसाठी हिरव्या रंगाची नंबरप्लेट ठरवली आहे. या प्लेटवर ज्या रंगाचे आकडे असतील त्यावरून वाहन खासगी का व्यावसायिक हे समजणार आहे. पांढरे आकडे खासगी वाहनासाठी तर पिवळे आकडे व्यावसायिक वाहनासाठी वापरले जातील.