न्यायालयाच्या परवानगीने दिवाळीत पाच दिवसांसाठी उघडण्यात येणार मुंबईतील दोन जैन मंदिरे


मुंबई: उच्च न्यायालयाने दिवाळीच्या काळात मुंबईतील दोन जैन मंदिरे उघडण्यास परवानगी दिली असून त्यानुसार दादर आणि भायखळ्यातील जैन मंदिरांचे दरवाजे उघडणार आहेत. ही मंदिरे धनत्रयोदशी आणि भाऊबीजेदरम्यानच्या पाच दिवसांसाठी खुली ठेवण्याची परवागनी देण्यात आली आहे. त्याचबरोबर ही जैन मंदिरे सकाळी सहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुली राहतील. पण फक्त 15 लोकच 15 मिनिटांच्या कालावधीत मंदिरात सोडले गेले पाहिजेत, असा दंडक न्यायालयाने घालून दिला आहे. पण न्यायालयाने मुंबई आणि लगतच्या परिसरातील इतर 100 मंदिरे खुली करण्याची विनंती फेटाळून लावली.

यापूर्वी जैन समाजाकडून ऑगस्ट महिन्यातही पर्यूषण पर्वाच्या काळात मंदिरे सुरु करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पण तेव्हा या मागणीला राज्य सरकारने नकार दर्शविला होता. राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केली जात असल्यामुळे आता मुंबईसह राज्यातील इतर प्रार्थनास्थळांसाठीही हाच न्याय लावला जाणार का, हे पाहावे लागेल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात गर्दी टाळण्यासाठी मंदिरे बंद करण्यात आली होती. पण अनलॉक मोहिमेतंर्गत राज्य सरकारने हॉटेल्स, सार्वजनिक वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार सुरु करण्याची मुभा दिली असताना मंदिरे का सुरु केली जात नाहीत, असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे.