अलिबाग कारागृहातील दोन पोलिसांचे अर्णब गोस्वामींना फोन पुरवल्याप्रकरणी निलंबन


अलिबाग – दोनच दिवसांपूर्वी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटकेत असेलल्या संपादक अर्णब गोस्वामी यांना मोबाईल फोन पुरविल्याची बाब समोर आली होती. दरम्यान, दोन कारागृह पोलिसांवर त्यांना मोबाईल फोन पुरविल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर ही कारवाई खातेनिहाय चौकशीनंतर करण्यात आली आहे.

अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तिघांनाही यानंतर अलिबाग कारागृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. अर्णब गोस्वामी यांनी कारागृहाच्या विलगीकरण कक्षात मोबाईल फोनचा वापर केल्याची बाब समोर आल्यानंतर तळोजा कारागृहात तिन्ही आरोपींची रवानगी करण्यात आली होती.

कारागृह प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन खातेनिहाय चौकशी सुरु केली होती. याबाबत इतर कैद्याकडेही चौकशी करण्यात आली. कारागृहातील दोन पोलीस पैसे घेऊन त्यांना स्वताचा मोबाईल वापरासाठी देत असल्याचे यावेळी समोर आले. यानंतर सुभेदार अनंत भेरे आणि पोलीस शिपाई सचिन वाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्याकडे मोबाईल कसा आला या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरु असल्याचेही कारागृह अधिक्षक ए.टी. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.