अमेरिकेत डिसेंबरमध्येच उपलब्ध होऊ शकते कोरोना प्रतिबंधक लस


न्यूयॉर्क: जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असून संपूर्ण देशाचे लक्ष कोरोनाचा बिमोड करणाऱ्या लसीकडे लागून राहिले आहे. त्यातच अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा एक कोटींच्या पार गेला असल्यामुळे कोरोनाची रोकथाम करणारे औषध कधी उपलब्ध होईल, याची सगळेजण वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेत डिसेंबर महिन्यात लस उपलब्ध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील फायजरने विकसित केलेल्या लसीची चाचणी सुरू आहे. या चाचणीचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले असून ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी आणि सुरक्षित ही लस असल्याचे आढळून आले आहे. याबाबत माहिती देताना अमेरिकेचे आरोग्य मंत्री एलेक्स अजार यांनी सांगितले की, आपल्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष आरोग्य प्राधिकरणाला फायजर कंपनी लवकरात लवकर सोपवू शकतात.

त्याचबरोबर लसीकरण मोहिमेची अमेरिकन सरकारने तयारी केल्याचे त्यांनी सांगितले. ही कोरोना प्रतिबंधक लस फायजर कंपनीने जर्मन कंपनी बायोएनटेकसोबत संयुक्तरीत्या विकसित केली आहे. फायजरकडून सोमवारी चाचणीबाबत माहिती देण्यात आली. सुरुवातीच्या निष्कर्षानुसार, लशीचा पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांत आणि दुसऱ्या डोसानंतर सात दिवसांमध्ये संबंधित व्यक्तिंमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या पहिल्या भागात ही लस कोरोनाला अटकाव करण्यास प्रभावी ठरत असल्याचे निदर्शनास आल्याचे फायजरचे अध्यक्ष आणि सीईओ अल्बर्ट बोर्ला यांनी सांगितले.

अजार यांनी पुढे सांगितले की, दर महिन्याला फायजरने विकसित केलेली जवळपास दोन कोटी लसींचे डोस सरकारला उपलब्ध होतील. लसीसंदर्भात १.९५ अब्ज डॉलरचा करार अमेरिकन सरकार आणि फायजर यांच्यात झाला असून ५० लाख नागरिकांसाठी लस उपलब्ध होणार आहे. लसीला मंजुरी देण्यासाठी चाचणीच्या डेटाची प्रतिक्षा असून त्यानंतर अन्न व औषध प्रशासन याबाबत निर्णय घेईल असेही, त्यांनी सांगितले.

तसेच मॉडर्ना इंकसह इतर कंपन्यांची देखील लस लवकर उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. या महिन्याच्या अखेरीस काही लस चाचणीचे प्राथमिक निष्कर्ष समोर येण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले. लसीला मंजुरी मिळाल्यानंतर रुग्णालयात दाखल असलेले वृद्ध, आरोग्य कर्मचारी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस आणि एप्रिल महिन्यापर्यंत सर्व नागरिकांसाठी लस उपलबध होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.