आताच आधारशी लिंक करा जनधन खाते, अन्यथा मिळणार नाही एवढ्या लाखांचा फायदा


नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांना 31 मार्च 2021 पर्यंत सर्व खातेधारकांचा आधार नंबर लिंक करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, पॅन नंबर ज्या खात्यांमध्ये आवश्यक आहे तिथे पॅन नंबर आणि जिथे आधार नंबर महत्त्वाचा आहे तिथे आधार नंबर 31 मार्च 2021 पर्यंत लिंक झाला पाहिजे. त्याचबरोबर 2.30 लाख रुपयांचा फायदा हवा असेल तर प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये वेळीच आपले खाते उघडा आणि आधारशी लिंक करण्याची सूचनाही निर्मला सीतारमण यांनी केली आहे.

जनधन खातेधारकांसाठी अनेक फायदे आहेत. यामध्ये ओव्हरड्राफ्टसह रुपे डेबिट कार्डदेखील उपलब्ध आहे. या डेबिट कार्डावर 1 लाख रुपये अपघाती विमा विनामूल्य मिळत आहे. 28.8.2018 नंतर उघडण्यात आलेल्या जनधन खात्यावर अपघाती विमा वाढवून, आता तो 2 लाख करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त या कार्डावर 30,000 रुपयांचा मोफत जीवन विमा कव्हरही मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्याच खातेधारकांना या सुविधा मिळणार ज्यांनी 15.8.2014 पासून 31.1.2015 दरम्यान खाते उघडले आहे.

बँकेत जाऊन तुम्ही तुमचे खाते आधारशी लिंक करू शकता. तुम्हाला यासाठी आधार कार्ड, तुमची पासबुकचा फोटो घ्यावा लागेल. यानंतर एक फॉर्म सबमिट करावा लागेल. एकदा का तुमचे खाते आधारशी लिंक झाले तर यासंबंधी मोबाइलवर मेसेज मिळेल. यातही जर तुमचा आधारशी लिंक असलेला मोबाइल नंबर आणि बँकेत दिलेला मोबाइल नंबर वेगळा असेल तर तुम्हाला मेसेज मिळणार नाही. या सरकारी योजनेमध्ये लाभार्थ्यांना लाभाची रक्कम थेट जनधन खात्यात पाठवली जाते. दरम्यान, 10,000 रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा ही प्रत्येक कुटुंबासाठी फक्त एका खात्यात उपलब्ध असणार आहे. यातही कुटुंबातील महिलेला प्राधान्य देण्यात आले आहे.