दिवाळी आधीच किरीट सोमय्यांचा धमका; नाईक कुटुंबियांकडून रश्मी ठाकरेंनी घेतली जमीन


मुंबई – रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी करण्यात आलेल्या अटकेवरून राज्यात सध्या नवा वाद उभा राहिला आहे. अर्णब गोस्वामी यांना कारागृहात ठेवण्यात आले असून नुकताच त्यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. पण तत्पूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याच प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुबांतील व्यवहारावरून गौप्यस्फोट केला आहे. मनिषा रवींद्र वायकर यांचेही नाव या जमीन व्यवहारात सोमय्या यांनी घेतले आहे.

अन्वय नाईक परिवाराशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत ते का लपवण्यात आले. रायगड जिल्ह्यातील कोलेई (ता. मुरूड) येथे रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी अन्वय मधुकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या. उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का?, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी ठाकरे कुटुबांवर केला आहे.


जमीन व्यवहाराची कागदपत्रेही किरीट सोमय्या यांनी ट्विट केली आहेत. ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवार जमीन व्यवहार. गाव- कोलेई, तालुका- मुरुड, जिल्हा- रायगड. महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना ७/१२ प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक-रश्मी उध्दव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे या ठिकाणी दिसत असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई येथे जमीन घेतली, असा दावा किरिट सोमय्या यांनी केला आहे. हा व्यवहार उद्धव ठाकरे यांनी का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा सवाल किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.