भारत- चीन सैन्यमाघारीचा त्रिसूत्री कार्यक्रम निश्चित


नवी दिल्ली – भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत सैन्यमाघारीचा कालबद्ध त्रिसूत्री कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. सैन्यमाघारीसाठी एप्रिल- मे महिन्यापर्यंतची कालमर्यादा घालण्यात आली आहे. माघारीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी दोन्ही देशांची संयुक्त यंत्रणा उभारण्याचेही निश्चित करण्यात आले.

या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात दोन्ही देशांमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील रणगाडे आणि शस्त्रसज्ज सैन्य विशिष्ट मर्यादेपर्यंत मागे घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पॅंगॉन्ग लेकच्या उत्तर किनाऱ्यावरून दोन्ही देशांचे सैन्य प्रतिदिन ३० टक्के असे ३ दिवसात मागे जाणार आहे. भारतीय सैन्य धनसिंग थापा पोस्टपर्यंत मागे येईल तर चिनी सैन्य फिंगर ८ च्या मागे सरकेल. तिसऱ्या टप्प्यात दोन्ही सैन्य पँगाँग लेकच्या दक्षिण किनाऱ्यावरून माघार घेईल.

या माघारीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी दोन्ही देशांची संयुक्त यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे. त्यामध्ये दोन्ही सैन्याधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकांसह मानवरहीत हवाई वाहने आणि उपकरणांचाही समावेश असणार आहे.