वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर दंड भरण्यास टाळाटाळ करणाऱ्याचा वाहन परवाना होणार रद्द


मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर दंड भरण्यास वाहनचालक कायम टाळाटाळ करतात. पण दंड न भरल्यास वाहनचालकांचा वाहन परवाना रद्द होण्याची आता शक्यता आहे. राज्यात वाहतूक नियम उल्लंघन केलेला ७०० कोटी रुपयांहून अधिकचा दंड थकीत आहे, त्यापैकी सुमारे २८० कोटी रुपये म्हणजे सुमारे ४० टक्के रक्कम मुंबईतील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थकली आहे.

परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे याबाबत म्हणाले की, वाहतूक नियम उल्लंघन गुन्हे शून्यावर आणणे सोपे काम नाही. गुन्हा करणाऱ्या चालकाची ओळख बऱ्याच प्रकरणांमध्ये पटत नाही. सहसा वाहन मालकाला या नोटीस बजावल्या जातात आणि काही प्रकरणांमध्ये पत्ते योग्य नाहीत किंवा दिलेला मोबाइल क्रमांक चुकीचा असतो. आपल्या प्रणालीतील डेटा गुणवत्ता चिन्हापर्यंत नाही.

त्यात अनेक अडचणी असल्यातरी चांगल्या वसुलीसाठी येत्या काही दिवसांत स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्याची परिवहन विभागाची योजना आहे. आम्ही गरज पडल्यास चुकीच्या वाहनचालकांचे परवाने तीन ते सहा महिन्यांसाठी निलंबित करू किंवा रद्द करू, असेही त्यांनी सांगितले.

मागील दोन महिन्यांपासून आरटीओ विभागाने ई-चलन सुरू केले आहे. वाहनचालक आता क्रेडिट/ डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंग वापरून कोणत्याही स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरवरून ई-चलन दंड भरू शकतात. वाहन निरीक्षक वाहन थांबवून कारवाई करतात. वाहतूक निरीक्षक स्पीडगन किंवा सीसीटीव्हीव्दारे करत नसल्यामुळे एक कारवाई करत असताना दुसरी वाहने निघून जातात, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आरटीओच्या नियमानुसार, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर दंडाची तरतूद आहे. गुन्ह्याच्या प्रमाणानुसार वेगवेगळा दंड आहे, तसेच गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास दंडाच्या रकमेतही वाढ होते. १५ दिवसांच्या आत वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्याला ई-चलन दंड भरावा लागतो. १६व्या दिवसापासून पैसे देण्यास विलंब केल्याबद्दल प्रतिदिन १० रुपये दंड आकारला जातो.