अॅडलगिव्ह आणि हुरून इंडियाने जारी केली देशातील सर्वात दानशूर व्यक्तींची यादी


मुंबई – अॅडलगिव्ह-हुरून इंडियाच्या २०२० च्या दानशूर व्यक्तींच्या यादीत माहिती तंत्रज्ञान कंपनी विप्रोचे मालक अझीम प्रेमजी यांनी या वेळी अव्वल स्थान प्राप्त केले आहे. सरासरी दररोज २२ कोटी रुपये अझीम प्रेमजी यांनी दान केले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर एचसीएल टेक्नॉलॉजीचे चेअरमन शिव नाडर आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आहेत.

आपली २०२०ची देशातील सर्वात दानशूर व्यक्तींची यादी हुरून इंडिया आणि अॅडलगिव्हने जारी केली आहे. ही भारतातील सर्वाधिक दातृत्व असणाऱ्या लोकांची सातवी वार्षिक क्रमवारी आहे. देशात सर्वाधिक दान करणारे वैयक्तिक दात्यांना समोर आणण्याच्या उद्देशाने यादी प्रकाशित केली जाते. २०२० च्या यादीत समाविष्ट लोकांची दान केलेली गणना १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० पर्यंत केलेल्या ५ कोटी रुपयांहून जास्त रोकड किंवा रोकड सममूल्य दानाच्या आधारावर केली आहे.

एकूण ११२ लोकांचा लोककल्याणासाठी दान करणाऱ्या भारतीयांच्या यादीत समावेश केला आहे. २०१९ च्या तुलनेत यादीत दानशूरांची संख्या १२ टक्के वाढली आहे. आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमारमंगलम बिर्ला यांना या यादीत चौथा क्रमांक मिळाला आहे. तर वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल पाचव्या क्रमांकावर आहेत.