संजय राऊतांमुळे महाराष्ट्रातही शिवसेनेची अशीच अवस्था होईल – निलेश राणे


मुंबई – सत्ताधारी एनडीएविरोधात आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. बिहारमध्ये पहिल्यांदाच 50 जागांवर शिवसेना लढणार असल्याचे जाहीर केले. परंतु 22 जागांवर शिवसेनेने उमेदवार उभे केले होते, पण यातील सर्व 22 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान शिवसेनेला झाले आहे. यावरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करत भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांवरही टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी शिवसेनेवर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या शिवसेनेला मिळालेल्या मतांच्या यादीचा मजकूर निलेश राणे यांनी पोस्ट केला आहे. त्याचबरोबर देशात वारंवार स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचे परत एकदा अभिनंदन, असे म्हटले आहे. तसेच शिवसेनेची परिस्थिती बिहारमध्ये जशी झाली आहे तशीच परिस्थिती संजय राऊत यांच्यामुळे महाराष्ट्रातही होईल, असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.


संज्या आज संध्याकाळपासून कंपाऊंडर जवळ बसला असेल. संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेत आहे तोपर्यंत विरोधकांना भीती नाही कारण या निवडणुकीमध्ये शिवसेनेची बिहारमध्ये जी अवस्था केली तशीच शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात संज्या राऊत करेल ही आम्हाला खात्री असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.


त्याचबरोबर राहुल गांधींवर टीका करताना निलेश राणे म्हणाले, राहुल गांधींना राजकारणात बरच शिकावे लागेल. भाजपसमोर राजकरण करताना राजकारणाची उंची किती व कशी असली पाहिजे हे बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक निवडणुकीने दाखवून दिले. राहुल गांधींच्या नेहमीच्या 15 मिनिटांच्या भाषणामध्ये 12 मिनिटं फक्त मोदींची बदनामी ही कोणाला पचत नाही आणि पटतही नाही.