सेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिमटा


मुंबई: बिहारच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला डिवचले आहे. शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे बिहारमध्ये डिपॉझिट जप्त झाले. त्यांना एक टक्काही मते आपापल्या मतदारसंघात पडली नाहीत. मग उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा चमत्कार आता कुठे गेला, असा बोचरा सवाल विचारत सोमय्या यांनी शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले.


शिवसेनेने बिहारमध्ये भाजपला शह देण्यासाठी 23 जागांवर उमेदवार उभे केले होते. शिवसेनेला या निवडणुकीसाठी ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी हिरीरीने प्रचारही केला होता. पण एकूण 23 जागांपैकी 21 जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली होती.

साहजिकच भाजप शिवसेनेवर टीका करण्याची ही संधी सोडणार नाही, हे स्पष्ट होते. त्यानुसार किरीट सोमय्या यांनी आता शिवसेनेवर पहिला वार केला आहे. थेट उद्धव ठाकरे यांच्या क्षमतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून यावर काय प्रतिक्रिया देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.