नेटकऱ्यांच्या दणक्यानंतर ‘अॅमेझॉन’ने हटवली आक्षेपार्ह उत्पादने


मुंबई – ऑनलाईन खरेदीच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘अॅमेझॉन’ला भारतीय नेटकऱ्यांनी जोरदार दणका दिला आहे. भारतीय नेटकऱ्यांकडून समाजमाध्यमांकडून तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवरून आक्षेपार्ह उत्पादने काढून टाकण्यात आली आहेत.

अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर भारतीय संस्कृतीचा अवमान करणारी आणि धार्मिक भावना दुखावणारी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामध्ये ‘ओम’ लिहिलेले पायपुसणी आणि देवदेवतांची चित्र असलेली अंतर्वस्त्र यांचा समावेश होता. मात्र, समाजमाध्यमांवर त्याबाबत तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर ती काढून टाकण्यात आली आहेत.

आक्षेपार्ह उत्पादने अॅमेझॉनच्या वेबसाईटवर ठेवल्यानंतर समाजमाध्यमांवर त्याचा निषेध करण्यात आला. नेटकऱ्यांनी ‘बॉयकॉट अॅमेझॉन’ ही मोहीमच उघडण्यात आली. या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अॅमेझॉनवर मोठ्या प्रमाणात आगपाखड करण्यात आली. अॅमेझॉनने ही आक्षेपार्ह उत्पादने काढून टाकल्यानंतरही या मोहिमेला मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे.