पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडू शकणार माणूस

फोटो साभार ग्रीन लेमन

इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानातील अग्रणी कंपनी बीएमडब्ल्यूने माणूस आकाशात पक्ष्यांप्रमाणे उडू शकेल असा विंग सुट तयार केला असून गेली तीन वर्षे कंपनी या सुटवर काम करत होती. यामुळे वर्षानुवर्ष माणसाने पक्षाप्रमाणे आकाश भरारी घेण्याचे पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे असे सांगितले जात आहे. या सुट मुळे माणूस इलेक्ट्रिक जॅकेटच्या सहाय्याने १० हजार फुटांवर ताशी ३०० किमी वेगाने उडू शकणार आहे.

व्यावसायिक विंग सुट पायलट, स्काय डायव्हर, बेस जंपर, पॅराग्लायडिंग प्रशिक्षक व टेंडम पायलट पिटर साल्जमन याने या सुटचे डिझाईन केले आहे. पिटर नेहमी ग्लाईड रेशो वाढविण्यासाठी व पॅराशूट उघडण्यापूर्वी क्षितिजाशी समांतर जादा अंतर कव्हर करण्यासाठी पारंपारिक विंग सुटचा वापर करत असे. त्याचा वेग साधारण ताशी १०० किमी पर्यंत होता. पण त्याने तयार केलेल्या नव्या सुटला चेस्ट माउंटवर दोन कार्बन प्रोपेलर बसविल्याने हा वेग ताशी ३०० किमी वर गेला आहे. त्याने पूर्वी या सुटचे स्केच तयार केले होते पण आता त्याचा प्रोटोटाईप तयार झाला आहे.

या सुटच्या पहिल्या चाचणी उड्डाणासाठी साल्जमन याला हेलिकॉप्टरमधून आल्प्स पर्वतरांगात १० हजार फुट उंचीवर उडी मारण्यास सांगितले गेले आणि त्यानंतर त्याचा वेग पाहून सर्व हैराण झाले असे समजते.