मुकेश अंबानी यांनी कामाख्या देवी मंदिरात दिले १९ किलो सोन्याचे कळस

देशातील सर्वाधिक श्रीमंत आणि बडे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आसाम मधील प्रसिद्ध प्राचीन कामाख्या देवी मंदिरात १९ किलो वजनाचे सोन्याचे तीन कळस दान दिले आहेत. विशेष म्हणजे अंबानी यांनी स्वतःच्या देखरेखीखाली हे कलश मुंबईतील सोनाराकडून बनवून घेतल्याचे सांगितले जात आहे. कळसाचा मुख्य साचा तांब्याचा असून त्यावर सोन्याचा पत्रा बसविला गेला आहे.

करोना काळात देशातील अन्य मंदिरांप्रमाणे आसाम मधील हे मंदिर सुद्धा बंद होते. पण नुकतेच ते भाविकांसाठी खुले केले गेले आहे. त्यानंतर प्रथमच मंदिराला एवढे मोठे दान मिळाले आहे. अंबानी परिवार धार्मिक वृत्तीचा असून दरवर्षी ते कोणत्या ना कोणत्या मंदिरात दान देत असतात. आजपर्यंत त्यांनी केदारनाथ, बद्रीनाथ, नाथद्वारा व अन्य मंदिरात ५ कोटींपेक्षा अधिक दान दिले आहे.

कामाख्या मंदिर हे सतीच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक असून त्याला कामक्षेत्र, कामरूप असेही म्हटले जाते. येथे माता सतीची योनी पडली होती असा समज आहे. त्याच जागी हे प्राचीन मंदिर उभे आहे. प्रामुख्याने ते तंत्रसिद्धीचे प्रमुख केंद्र मानले जाते. अंबानी यांनी दिलेले कळस बसविण्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. अंबानी यांचे इंजिनीअर खास या कामासाठी कामाख्या मंदिरात हजर आहेत असे समजते.