मुंबई इंडीयन्स ने रेकॉर्ड पाचव्यांदा जिंकला आयपीएल चषक

फोटो साभार नवभारत टाईम्स

करोनामुळे या वर्षी युएई मध्ये खेळविल्या गेलेल्या आयपीएल १३ व्या सिझन मध्ये मुंबई इंडीयन्सने पाचव्या वेळी चषक जिंकून रेकॉर्ड केले आहे. कप्तान रोहित शर्मा याची कप्तानपदासाठी साजेशी खेळी आणि ट्रेंट बोल्ट यांची खतरनाक गोलंदाजी यामुळे मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला पाच विकेट गमावून सहज पराभूत केले. मुंबईने सर्वाधिक वेळा आयपीएल चषक जिंकणारा संघ म्हणून इतिहास रचला आहे.

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने सात विकेट गमावून १५६ धावा केल्या. कप्तान श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी ५० धावा करून त्यात मोठे योगदान दिले पण मुंबईचा हिटमन रोहितने कप्तानीला साजेसा खेळ करत ५१ चेंडूत ५ चौकार, ४ षटकार लगावत ६८ धावा केल्या. मुंबईने दिल्लीची धावसंख्या १८.४ ओव्हरमध्ये पाच विकेट गमावून गाठली. यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा कप्तान श्रेयस अय्यर याचे पहिल्यांदाच आयपीएल चषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

यापूर्वी मुंबई इंडीयन्सने २०१३, २०१५, २०१७ व २०१९ साली आयपीएल खिताब जिंकला आहे. या वर्षी दिल्लीच्या १५६ धावांचा पाठलाग करताना त्यांनी सुरवातच दणकेबाज केली. पहिल्या चार ओव्हर मध्ये मुंबईच्या ४५ धावा निघाल्या होत्या त्यात तीन षटकार आणि तीन चौकार होते. विशेष म्हणजे सुर्यकुमार याने कप्तानासाठी स्वतःची विकेट कुर्बान केली. ११ व्या ओव्हर मध्ये जलद सिंगल रन घेण्याच्या रोहितच्या हाकेला सूर्यकुमार नकार देत होता पण दरम्यान रोहित क्रीज सोडून दुसऱ्या टोकाला आला आहे हे पाहून त्याने स्वतःचे क्रीझ सोडून धाव घेतली होती.