भाजपला सोडचिट्ठी शत्रुघ्न सिन्हाला पडली महाग

तीन दशकाहून अधिक काळ भाजपचा बुलंद आवाज राहिलेल्या बॉलीवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हाला भाजपला सोडचिट्ठी देणे चांगलेच महाग पडल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत शत्रुघ्न पुत्र लव याला बंकीपूर मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला आहे. लव याने कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. त्याला भाजपच्या नितीन नवीन यांनी हरविले. विशेष म्हणजे हा मतदारसंघ मगध क्षेत्रात येतो. येथे विधानसभेच्या २६ जागा आहेत आणि या ठिकाणी महागठ्बंधन आघाडीचा दबदबा असल्याचे सांगितले जात होते.

शत्रुघ्नने भाजपला रामराम केल्यावर त्याच्या कुटुंबाचा हा सलग तिसरा पराभव आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्याने पत्नी पूनम यांना समाजवादी पक्षातर्फे लखनौ मतदार संघातून भाजपचे राजनाथसिंग यांच्याविरोधात उभे केले होते पण पूनम यांचा ३ लाखाहून अधिक मतांनी पराभव झाला होता.

शत्रुघ्न यांनी स्वतः त्यांच्या पारंपारिक पटना साहिब मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविली होती. भाजप मधून बंडखोरी करून ते त्यावेळी बाहेर पडले होते. पण येथेही भाजपच्या रविशंकर प्रसाद यांच्याकडून त्यांना हार पत्करावी लागली होती.