घटस्फोट संदर्भातील बातमीचे मेलेनिया यांना दुःख

फोटो साभार द रॅॅप

राष्ट्रपती पदाची शर्यत हरलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया यांच्यातील संबंध दुरावल्याच्या बातम्या चर्चेत असतानाच व्हाईट हाउस मधून बाहेर पडताच मेलेनिया ट्रम्प याना घटस्फोट देणार असल्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे. मात्र मेलेनिया यांच्या प्रवक्त्या स्टेफनी ग्रीशम यांनी मेलेनिया या वृत्ताने दुखावल्या गेल्याचे स्पष्ट केले आहे. या बातमीमुळे मेलेनिया नाराज झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. मेलेनिया यांनी या संदर्भात ट्रम्प यांची माजी राजकीय सहकारी ओम्रेसा न्यूमन हिच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे.

न्यूमन हिने तिच्या ‘फायर अँड फ्युरी इनसाईड द ट्रम्प व्हाईट हाउस’ या पुस्तकात ट्रम्प आणि मेलेनिया यांचे १५ वर्षाचे वैवाहिक जीवन संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचे लिहिले असून ट्रम्प व्हाईट हाउस मधून बाहेर कधी पडतात याचीच वाट मेलेनिया पाहत आहे असे म्हटले आहे. ट्रम्प जेव्हा राष्टपती पदाची निवडणूक जिंकले तेव्हाच मेलेनिया निराश झाली होती कारण ते जिंकतील याची तिला अपेक्षा नव्हती असा आरोप करतानाच न्यूमन यांनी व्हाईट हाउस मध्ये दोघांच्या बेडरूम्स वेगळ्या होत्या आणि बॅरन याच्या शाळेचे कारण देऊन मेलेनिया यांनी पाहिले पाच महिने व्हाईट हाउस मध्ये येण्याचे टाळले होते. तिला कधीच फर्स्ट लेडी बनायची इच्छा नव्हती असेही लिहिले आहे.

न्यूमन हिच्या या विधानांमुळे मेलेनिया दुःखी झाल्या असल्याचे स्टेफनी यांचे म्हणणे आहे.