गुडघे सांभाळा

knee
सध्या भारतातील निदान शहरी लोकांत तरी वजन वाढण्याची समस्या निर्माण झालेली दिसत आहे. वजन वाढण्याचे आणि लठ्ठपणाचे इतर अनेक दुष्परिणाम आहेतच. परंतु सगळ्यात मोठा दुष्परिणाम गुडघेदुखीच्या रूपाने जाणवत आहेत. शरीराचे वजन शेवटी गुडघ्यावरच पडत असते. गुडघेदुखीचा त्रास असणार्‍या अनेकांच्या या त्रासामागची कारणे शोधली असता अंतर्गत कारणे फार कमी आढळली. वाढते वजन आणि त्या वजनाचा पडणारा भार हेच एकमेव महत्त्वाचे कारण गुडघेदुखीमागे असल्याचे दिसून आले. तेव्हा गुडघे दुखण्याचा त्रास होत असेल तर आधी वजन कमी करणे याशिवाय कसलाही पर्याय नाही. हे लक्षात घेतले पाहिजे.

त्या व्यतिरिक्त गुडघेदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी इतरही काही उपाय आहेत. बरेच लोक दिवसभर एका जागी बसून काम करतात आणि ही बैठी कामे हेही एक वजन वाढण्याचे मोठे कारण आहे. मात्र आपली बसण्याची पध्दत खुर्चीची उंची आणि खुर्चीवर बसल्यानंतर पाय समोर टेकवण्याची सोय आहे की नाही या गोष्टीवरही गुडघेदुखी अवलंबून असते. खुर्चीवर बसल्यानंतर पाय लटकता कामा नयेत. पण ते लटकत असतील तर गुडघे दुखण्याचा त्रास वाढू शकतो.

खुर्चीवर बसल्या जागी काही व्यायाम करता येतात. आळस देणे हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे. आळस देण्याच्या बाबतीत आळशीपणा करू नका, असे योगतज्ञ नेहमी सांगतात ते याचसाठी. पूर्ण अंगाला ताण दिला की अंगाचे आखडलेपण कमी होते. असा आळस देताना पायाच्या घोट्यापासूनचे पाय फिरवावेत. त्यांनाहीताण द्यावा आणि त्याच्या घोट्यापासूनच्या पुढच्या हालचाली कराव्यात. त्यामुळे त्या व्यायामाचे परिणाम गुडघ्यावरसुध्दा होतात. गुडघ्यापासूनचा पाय हलवणे हाही बसल्याजागी करता येणारा व्यायाम आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment