ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर पॅटरनिटी लीव्हवर जाणार विराट


नवी दिल्ली – भारताचा हिटमॅन अर्थात रोहित शर्माचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कसोटी संघात समावेश करण्यात आल्याची माहिती बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिली. तर, पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली पॅटरनिटी लीव्हवर जाणार आहे.

दरम्यान, टी-20 नंतर एकदिवसीय संघातही संजू सॅमसनला संधी मिळाली आहे. तर, खांद्याच्या दुखापतीमुळे वरुण चक्रवर्ती ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर गेला आहे. चक्रवर्तीच्या जागी टी-20 संघात वेगवान गोलंदाज टी नटराजनला सामील करण्यात आले आहे. भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 3-3 एकदिवसीय आणि टी-20 नंतर 4 कसोटी सामने खेळेल.

बीसीसीआयच्या मेडिकल टीमने रोहितच्या फिटनेसचा आढावा घेऊन त्याला लिमिटेड ओव्हर्सच्या सीरीजमधून आराम देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, कसोटी मालिकेत रोहितला संधी देण्यात आली आहे. आयपीएलमधील मुंबई इंडियंसचा कर्णधार रोहित शर्मा हॅमस्ट्रिंग इंज्युरीमुळे काही सामन्यातून बाहेर गेला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहितची निवड देखील झाली नव्हती. परंतू, आता रोहित फीट झाला असून, आयीपएलमध्ये दुखापतीनंतर दोन सामनेही खेळला आहे. आयपीएलनंतर रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होईल.