कंगनाने मुंबई पोलिसांच्या समन्सला दुसऱ्यांदा दाखवली केराची टोपली


मुंबई : मागील काही महिन्यांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगणा राणावतच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी राजद्रोहाच्या आरोपावरुन कंगनाला समन्स बजावले होते. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेलला पोलिसांनी हजर राहायला सांगितले होते. पण भावाच्या लग्नाचे कारण देत तिने मुंबईला येण्याचे टाळल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्यांदा कंगना आणि तिच्या बहिणीला समन्स बजावले होते. पोलिस ठाण्यात 10 नोव्हेंबर 2020 रोजी उपस्थित राहा, असे आदेश देण्यात आले होते. पण पुन्हा एकदा तिने भावाच्या लग्नाचे कारण पुढे करत पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे टाळले आहे.

कंगनाच्या आज (10 नोव्हेंबर) भावाचे लग्न असल्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहण्यासाठी कंगना आणि तिच्या बहिणीने नकार दिला आहे. राणावत बहिणींचे असे म्हणणे आहे की, भावाचे लग्न झाल्यानंतरच आम्हाला मुंबईला येणे शक्य होईल. कंगना राणावतला हे समन्स राजद्रोहाच्या आरोपावरुन बजावण्यात आले होते. महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस आणि मुंबईबाबत चुकीच्या शब्दात तिने मत व्यक्त केले होते.

तत्पूर्वी 21 ऑक्टोबरच्या आधी वांद्रे पोलिसांनी कंगना रणौत आणि तिच्या बहिणीला पहिली नोटीस पाठवली होती. पण तिच्या वकीलांनी कंगना आणि रंगोली सध्या भावाच्या लग्नात व्यस्त असून त्या दोघी सध्या हिमाचल प्रदेशमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना मुंबईला येणे शक्य होणार नसल्याचे सांगितले होते. मुंबई पोलीस आता कंगना राणावतच्या या भूमिकेवर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.