बिहारमध्ये शिवसेनेसारखीच राष्ट्रवादीची देखील अवस्था, पडली नोटापेक्षा कमी मते


पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून बिहारमध्ये सत्तांतर होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण आज ज्याप्रमाणे कल समोर येऊ लागले आहेत. त्यानुसार नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या निकालांमध्ये एनडीए 130 तर महाआघाडी 102 जागांवर आघाडीवर आहे. या सर्वात विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील सत्ताधारी मित्र पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीला बिहार निवडणुकांत नोटापेक्षाही कमी मतदान झाले आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बिहार निवडणुकांत दुपारी 3.00 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकड्यांनुसार मोठ्या पराभवाचा सामना करावा लागत आहे. कारण, अद्याप एकाही जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादीला आघाडी घेत आली नाही. शिवसेनेने उभा केलेल्या 23 पैकी 21 जागांवर तर शिवसेनेच्या वाट्याला ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. 50 उमेदवार देण्याची घोषणा शिवसेनेने केली होती, पण प्रत्यक्षात 23 जागांवरच निवडणूक लढवली. तर, स्वतंत्रपणे बिहार निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसनंही लढवल्या होत्या. 40 स्टार प्रचारकांची यादी राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये, शरद पवार हे राष्ट्रवादीचे प्रमुख स्टार प्रचारक होते. पण, कोरोना प्रादुर्भावामुळे त्यांनी बिहारमध्ये प्रचारसभा घेतल्या नसल्याचे सांगण्यात येते.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडेवाडीनुसार 0.22 टक्के मते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहेत. तर, 0.05 टक्के मते शिवसेनेला मिळाली आहेत. या दोन्ही पक्षांच्या मतांपैकी नोटाला पडलेली मते अधिक आहेत. 1.74 टक्के नागरिकांनी विधानसभा निवडणुकीत नोटाला पसंती दिली आहे. एकूण 3 लाख 18 हजार 34 मते नोटाला मिळाली आहेत. तर 1.08 टक्के मते एमआयएमला मिळाली असून त्यांचे तीन उमेदवार आघाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दर्शविणाऱ्या आघाडी आणि पिछाडीच्या आकडेवारीत राष्ट्रवादीचा एकही उमेदवार दिसून येत नाही.