सीसीआयने दिले गुगलच्या पाच कंपन्यांची चौकशीचे आदेश


नवी दिल्ली – डिजिटल पेमेंट अॅप ‘गुगल पे’ने कथितरित्या अयोग्य व्यवसाय पद्धतीचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत इंटरनेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी गूगलच्या विरोधात सखोल तपासाचे कंपिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) आदेश दिले असून कायद्याच्या कलम ४ मधील विविध तरतुदींचे कंपनीने उल्लंघन केल्याचे आयोगाचे प्राथमिक मत असल्याचे आपल्या आदेशात सीसीआयने म्हटले आहे.

या प्रकरणी आपल्या महासंचालकांना नियामकाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कथितरित्या अयोग्य व्यवसाय पद्धतीचा ‘गुगल पे’ने अवलंब केल्याचा ठपका ठेवत या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आयोगाच्या कायद्याचे कलम ४ हे एखाद्याने बाजारात आपल्या वर्चस्वाचा दुरूपयोग केल्यासंबंधी आहे.

अल्फाबेट इंक, गुगल एलएलसी, गुगल आयर्लंड लिमिटेड, गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि गुगल इंडिया डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याविरोधात सीसीआयने चौकशीचे आदेश दिले आहेत. सध्या जे काही गुगल करत आहे ते अयोग्य आहे आणि भेदभाव करणाऱ्या अटी शर्थी त्यांनी ठेवल्या आहेत. याअंतर्गत, गुगल पेच्या स्पर्धक अ‍ॅप्सना बाजारात प्रवेश प्रदान केला जात नसल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत असल्याचे सीसीआयने म्हटले आहे.

गुगलच्या पैसे देऊन वापरण्यात येणारी अ‍ॅप्स आणि अ‍ॅप्समध्ये असलेल्या कोणत्याही सेवांच्या उपयोगासाठी देण्यात येणाऱ्या पैशांवर ३० टक्के कमिशन देण्याच्या निर्णयावर भारतीय अ‍ॅप्स विकासकांनी चिंता व्यक्त केली आहे. बर्‍याच विकासकांचे म्हणणे आहे की कंपनी देशांतर्गत अ‍ॅप विकासकांना त्यांच्या डिजिटल सेवा विक्रीसाठी गुगलच्या बिलिंग सिस्टमचा वापर अनिवार्य करण्यास भाग पाडू शकत नाही.

दरम्यान, यानंतर गुगलनेही प्रतिक्रिया देत सीसीआयने अनेक दाव्यांना फेटाळल्याचा आम्हाला आनंद असल्याचे म्हटले. अत्यंत स्पर्धात्मक पद्धतीने गूगल पे चालविले जात आहे आणि त्याची सेवा साधी आणि सुरक्षित असल्यामुळे ग्राहक त्याला प्राधान्य देतात हेच त्याचे यश आहे, हे तपासणीदरम्यान दिसून येईल, असे गुगल पेच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले.