अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ; सत्र न्यायालयाने चौकशीला दाखवला हिरवा कंदील


अलिबाग: अलिबाग सत्र न्यायालयाने सोमवारी वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीला हिरवा कंदील दाखवला. तळोजा कारागृहात सध्या गोस्वामी यांना ठेवण्यात आले असून, न्यायालयाने पोलिसांना तिथेच दररोज तीन तास चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. तर जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्यामुळे गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

रायगड पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्णब गोस्वामी यांना देण्यात आलेल्या न्यायालयीन कोठडीला आव्हान दिले होते. त्यावर सोमवारी सुनावणी पार पडली. न्यायालयीन कोठडीतच गोस्वामी यांची पोलीस चौकशी करता यावी यासाठी रायगड पोलिसांनी तीन तासांची वेळ मागितली होती, ती न्यायालयाने मंजूर केली आहे.

आरोपी नितेश सारडा यांच्या वकिलांनी अलिबागच्या जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असलेला पुनर्निरीक्षण अर्ज कायद्याच्या कसोटीवर टिकणारा आहे का असा प्रश्न उपस्थित केला. आज त्या अर्जावर सुनावणी होणार आहे. याचवेळी गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर देखील सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे अर्णब गोस्वामी यांचे वकील अ‍ॅड. अंकित बंगेरा यांनी सांगितले.