जामीनासाठी अर्णब गोस्वामींची आता सर्वोच्च न्यायालयात धाव


मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अंतरिम जामीन नाकारला असून अर्णब यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून अर्णब यांना दिलासा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर त्यांना हजर केले असता, त्यांना त्यावेळी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर अर्णब यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन जामिनासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना सत्र न्यायालयात जाण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या वकिलाने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे, त्याचबरोबर आता सर्वोच्च न्यायालयातही अर्ज केला आहे. त्यामुळे त्यावर न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.