सत्ता हस्तांतरणात ट्रम्प यांनी घातला खोडा

फोटो साभार एनबीसी न्यूयोर्क

अमेरिकन अध्यक्षीयपदाची प्रचंड गाजलेली निवडणूक प्रक्रिया संपून अध्यक्षपदी जो बायडेन यांची निवड झाल्याची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष सत्ता हस्तांतरणात डोनल्ड ट्रम्प यांनी खोडा घातला आहे. त्यांनी बायडेन यांच्या ट्रान्झिशन टीम कडे किल्ल्या सोपविण्यास नकार दिला असून हिम्मत असेल तर किल्ल्या घेऊन दाखवा असे आव्हान दिले असल्याचे समजते.

अमेरिकन कायद्यानुसार राष्ट्रपती निवडणूक झाल्यावर जर सरकार बदलले तर विजयी अध्यक्ष ट्रान्झीशन टीम बनवितो. त्यानुसार बायडेन यांनी टीम बनविली आहे. ही टीम जानेवारी २०२१ साठी ट्रम्प यांनी जी महत्वाची धोरणे आखली होती त्यावर काम करते. त्यासाठी या टीम ला फेडरल गव्हर्नमेंटच्या प्रत्येक बिल्डिंग मधील कार्यालयात जागा दिली जाते. तेथेच पुढील सरकार चालविण्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी केली जाते. त्यासाठी वेगळे बजेट असते. यंदा ते १ कोटींचे आहे.

डोनल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांचा विजय मान्य केलेला नाही. मतदानात गडबड झाल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे सोमवारी जेव्हा बायडेन यांची टीम जनरल अॅडमिनिस्ट्रेशन प्रमुख एमिने मर्फी यांच्या कार्यालयात कागदपत्रे घेऊन गेली तेव्हा त्यावर सही करण्यास त्यांनी नकार दिला. व्हाईट हाउसच्या परवानगीशिवाय सही करता येत नाही असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या टीमचे काम सुरु होऊ शकले नाही.