घनदाट जंगलातील बिनसर महादेव मंदिर


हिमालयाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंड राज्यात जेवढी माणसे राहतात तेवढीच कदाचित मंदिरे आहेत. तेथे माणसांपेक्षा देवी देवतांची संख्या जास्त असावी. काही मंदिरे इतक्या घनदाट जंगलात आहेत कि तेथे जाण्यासाठी नुसता भक्तीभाव नाही तर साहसाची सुद्धा गरज आहे. त्यातील एक आहे बिनसर महादेव मंदिर. समुद्रसपाटीपासून २४८० मीटर उंचीवर पौडी भागात हे मंदिर आहे.

असे मानतात कि महाराजा पृथ्वी यांनी वडील बिंदू यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे मंदिर बांधले त्यामुळे त्याला बिंदेश्वर महादेव असेही म्हटले जाते. मात्र या मंदिराचा संबंध पांडवांशी असल्याचेही संगितले जाते. पांडव त्याच्या अज्ञातवासातील काही काळ येथे राहिले होते. येथे भीम घट नावाची एक प्रचंड शीला आहे.

प्राचीन शिल्पकलेचा बेजोड नमुना असलेल्या या मंदिराच्या आसपास आजही मैलोनमैल वस्ती नाही. हिमालयाच्या त्रिशूल शृंखलेचा अतिसुंदर नजारा येथून पाहता येतो. देवदारचे दाट अरण्य भोवती आहे. मंदिरात एक जलधारा अहोरात्र वाहते. पूर्वी येथे येण्यासाठी रस्ता नव्हता. आता रस्ता आहे तरी १२ किमीचे अंतर पायी चढण पार करून जावे लागते. वाटेत जंगली पशुंचे भय आहे. दिवाळी नंतर ११ दिवस येथे यात्रा भरते. त्यावेळी दिवसरात्र पूजा पाठ केले जातात. महिला गढवाली लोकगीते गातात. रात्री देवता नृत्य होते. येथे शिवाचे वाहन नंदी दान देण्याची प्रथा आहे.

Leave a Comment