कधी झाली एक्झिट पोलची सुरवात?

निवडणुका जाहीर झाल्या की एकंदर मतदारांचा कौल काय याची चाचपणी करण्याचे एक शास्त्र विकसित केले गेले आहे. त्याचे तीन भाग पडतात. त्यात प्री पोल, एक्झिट पोल आणि पोस्ट पोल यांचा समावेश असतो. आजकाल एक्झिट पोल विशेष लोकप्रिय ठरले असून मतदान झाल्याबरोबर एक्झिट पोल सर्वेक्षणे केली जातात आणि अनेक टीव्ही वाहिन्या त्यावर सतत चर्चा करत राहतात हे  आजचे सामान्य दृश्य बनले आहे. पण हे एग्झिट पोल म्हणजे नक्की काय आणि त्याची सुरवात कधी झाली याची माहिती फार थोड्या लोकांना असते.

१९६० मध्ये सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी (सीएसडीएस) तर्फे मतदान झाल्यानंतर मतदारांचा कौल जाणून घेऊन काय निकाल लागेल याचा अंदाज वर्तविण्यासाठी एक मॉडेल किंवा आराखडा बनविला. एग्झिट पोल हे मतदान झाल्याबरोबर काही मतदान केंद्रांबाहेर लगेच मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे आणि त्यावरून मतदाराने कुणाला मत दिले असावे याचा अंदाज करण्याची प्रक्रिया आहे. या उलट प्री पोल मध्ये निवडणुका जाहीर झाल्यावर जनमत घेऊन जनतेची मते समजून घेतली जातात. विविध प्रकारे ही आकडेवारी गोळा केली जाते आणि त्याचे विश्लेषण करून अंदाज वर्तविले जातात.

१९९६ मध्ये लोकसभेच्या निवडणुकात प्रथम सीएसडीएसने या आधारावर एक्झिट पोलचे वर्तविलेले अंदाज बरोबर ठरले होते. १९९६ पासून भारतीय मिडियाने दूरदर्शन वर हे अंदाज देण्याची सुरवात केली. १९९८ मध्ये निवडणूक आयोगाने ओपिनियन आणि एग्झिट पोलवर बंदी घातली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती उठविली. सुरवातीला एग्झिट पोलचे अंदाज बरोबर येत होते मात्र अनेकदा ते चुकीचे ठरले आहेत. २००४,२०१३,२०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुका, २०१४ ची लोकसभा निवडणूक, २०१९ ची लोकसभा निवडणूक त्याचे उदाहरण आहे.