राजू श्रीवास्तवचे उद्धव ठाकरेंना प्रतिआव्हान; मराठी चित्रपट देखील बनवणार


लखनऊ : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फिल्म सिटी तिकडे नेऊन दाखवा, असे आव्हान दिले होते. यावर पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या फिल्म विकास परिषदेचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला आव्हान दिले आहे.

नुकतेच उत्तर प्रदेशच्या फिल्म विकास परिषदेच्या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी यावेळी एक मुलाखत दिली. ते म्हणाले की, फिल्मसिटी ही काही वस्तू नाही जे कोणी इकडचे तिकडे उचलून नेईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे हे वक्तव्य आव्हान कमी आणि राजकारण जास्त वाटते. त्यांना कदाचित योगी आदित्यनाथांची काम करण्याची पद्धत माहिती नाही. त्यांनी एकदा कोणतेही काम मनावर घेतले, तर ते पूर्णत्वास नेऊनच सोडतात. ग्रेटर नोएडामध्ये फिल्मसिटीसाठी जागा घेण्यात आली आहे. तिथे इतर कामे सुरु झाली आहेत. लवकरच त्याठिकाणी फिल्मसिटी उभारलेली दिसेल, असे श्रीवास्तव म्हणाले.

कोणाच्या तुलनेची आमची फिल्मसिटी आम्ही उभारणार नाही. तर त्यापेक्षाही चांगली फिल्मसिटी बनविणार असल्यामुळे तेथील लोकांना रोजगार मिळेल. एवढ्या चांगल्या सुविधा आम्ही देऊ की हिंदीच नाही तर मराठीसह इंग्रजी चित्रपट देखील तिथेच बनविले जातील, असे ते म्हणाले. त्यांना मुंबई आणि उत्तर प्रदेशच्या चित्रपटांमध्ये काय फरक आहे, असे विचारले असता उत्तर प्रदेश, बिहारचे अभिनेते, अभिनेत्री तिकडे जाऊन त्यांच्यातील दम दाखवितात. अनेक मोठी नावे आमच्या येथीलच आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आता सबसिडी मिळू लागली असल्यामुळे मुंबईच्या तुलनेचे चित्रपट बनविण्याचा खर्चही कमी होणार आहे. येथे इतर कामेही झटपट होतात. आता सिंगल विंडो सिस्टीम प्रत्येक जिल्ह्यात सुरु करण्यात आल्यामुळे निर्मात्यांना वेळेत सरकारी कामे आटोपता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवीगाळ आणि अश्लिलता वेबसिरीजमध्ये भरलेली असते. अशा प्रवृत्तींना आम्ही प्रोत्साहन देऊ शकत नाही. चांगला कंटेंट वेबसिरीजला मिळत नाही, ही मोठी समस्या आहे. वेबसिरीजसाठी सध्यातरी नाही कोणती सेन्सॉरशिप किंवा गाईडलाईन नसल्यामुळे त्यांना जे दाखवायचे आहे ते कोणताही विचार न करता ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखविले जाते. त्यांच्या कंटेंटमध्ये त्यांनी सुधारणा केली, त्यांनाही सबसिडी देण्याचा विचार करण्यात येईल, असे श्रीवास्तव म्हणाले.